जरी वर्तमान पत्रकारितेत मत प्रदर्शनाचं पूर्ण स्वातंत्र्य असलं तरी त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्याबरोबर काही बांधिलकी येते.

देशाला कालच स्वातंत्र्य मिळालं आहे. जोपर्यंत इथे स्थैर्य येत नाही, प्रगती करणं अशक्य आहे. त्यात देशाची फाळणी झाल्यामुळे हे काम अजूनच कठीण झाले आहे.

देशाची पहिली गरज आहे ती, अंतर्बाह्य सुरक्षितता ! देश सुरक्षित झाल्याशिवाय कुठलीच योजना आखता येत नाही.

पोलिसांचं कर्तव्य आहे, सरकारचा मान राखणे आणि देशवासीयांना संरक्षण देणे ! नुसते गुन्हेगार शोधून त्यांना शिक्षा करणे एवढंच तुमचं काम नाही, तर लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. जो कोणी पोलीस किंवा अधिकारी आपलं कर्तव्य करताना तोल घालवतो, तो पोलीस दलाचा सदस्य म्हणवून घ्यायला योग्य नाही.

या देशात काही तरुण असे आहेत की, त्यांना वाटतं देशात हिंदूराज असावं आणि फक्त हिंदू संस्कृतीलाच या देशात स्थान आहे. गांधीजी या वेड्या कल्पनेविरुद्ध लढताहेत. ते म्हणतात, केवळ ऐक्यच आपलं संरक्षण करू शकतो.

प्रथमच आपल्या प्रौढांना मताधिकार मिळाला आहे. जोपर्यंत लोक आपल्या अधिकाराचा वापर योग्य बुद्धीने करणार नाहीत, तोपर्यंत प्रजासत्ताक राज्य टिकणार नाही आणि त्यामुळे आपण खूप काही गमावून बसू.

प्रजासत्ताक राज्य प्रणालीत वर्तमानपत्रांना आणि प्रत्येक व्यक्तीला विचार मुक्तपणे मांडायला, संघटित व्हायला पूर्ण स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे.

लाखो लोकांच्या बलिदानामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आपण हे स्वातंत्र्य जर परदेशी संस्थांसाठी काम करणार्यांच्या आणि भय निर्माण करणार्यांवर सोपवलं तर त्या अनेक लोकांच्या बलिदानाचा अपमान होईल.

जातीभेदाने अडचणी निर्माण होतील. प्रत्येक भारतीय या देशाचा सुपुत्र किंवा पुत्री आहे. आपण प्रेमाने आणि एकमेकांच्या साह्याने या देशाचे भवितव्य उज्ज्वल करू.

हे खरं आहे की, आपण पारतंत्र्याला देशातून घालवले. पण त्यानंतर मात्र आपण अपापसात भांडत बसलो. जगासमोर आपण असं एक चित्र उभं केलं आहे की, जे आपल्या संस्कृतीच्या आणि गांधीजींच्या शिकवणीच्या पूर्ण विरुद्ध आहे.