जेवढा आपला शत्रू जास्त प्रबळ, तेवढी त्याच्याबद्दल जास्त आत्मियता’ हे सत्याग्रहाचं ध्येय आहे.

आपल्याला लढा द्यायचाच आहे तर तो पारदर्शक असावा. अशा लढ्यासाठी योग्य वेळ, योग्य परिस्थिती आणि जागा निवडताना जागरूक रहा. आपल्याकडे शरणार्थी म्हणून आलेल्या व्यक्तीशी लढायचं नसतं. कुठलाही सुसंस्कृत समाज आणि माणुसकीचे नियम आपल्याकडे शरण आलेल्या लोकांवर हात उगारायची परवानगी देत नाहीत.

जरी वर्तमान पत्रकारितेत मत प्रदर्शनाचं पूर्ण स्वातंत्र्य असलं तरी त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्याबरोबर काही बांधिलकी येते.

देशाला कालच स्वातंत्र्य मिळालं आहे. जोपर्यंत इथे स्थैर्य येत नाही, प्रगती करणं अशक्य आहे. त्यात देशाची फाळणी झाल्यामुळे हे काम अजूनच कठीण झाले आहे.

देशाची पहिली गरज आहे ती, अंतर्बाह्य सुरक्षितता ! देश सुरक्षित झाल्याशिवाय कुठलीच योजना आखता येत नाही.

पोलिसांचं कर्तव्य आहे, सरकारचा मान राखणे आणि देशवासीयांना संरक्षण देणे ! नुसते गुन्हेगार शोधून त्यांना शिक्षा करणे एवढंच तुमचं काम नाही, तर लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. जो कोणी पोलीस किंवा अधिकारी आपलं कर्तव्य करताना तोल घालवतो, तो पोलीस दलाचा सदस्य म्हणवून घ्यायला योग्य नाही.

आपण केलेल्या कामगिरीचा, मग तो यशस्वी होवो किंवा न होवो, आढावा घेणं आवश्यक आहे. याच्यामुळेच दुष्टशक्तीचा पूर्ण नायनाट होऊ शकतो.

देशात कम्युनिस्ट पार्टी नावाची विध्वंसक पार्टी आहे. त्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवून योग्य उपाय केल्यामुळे आज ती केवळ काही भागातच मर्यादित राहिली आहे.

राष्ट्रभाषेला प्रोत्साहन देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. या प्रयत्नामुळे कुठल्याही अडचणींशिवाय तिला पूर्ण देशात मान्यता मिळेल. हिंदी भाषेचा विस्तार सागरासारखा झाला पाहिजे. मग या महासागरात इतर भाषांना योग्य स्थान मिळेल. राष्ट्रभाषा कुठल्याही प्रांताच्या किंवा जातीच्या मालकीची नाही.

भ्याड आणि मागे जाणार्‍या जनतेकडून काही अपेक्षा ठेवू नका. ज्या शूर माणसाने हा लढा सुरू केला आहे, त्याच्यात त्या भ्याड लोकांनाही शूर बनवण्याची क्षमता आहे.

या देशात काही तरुण असे आहेत की, त्यांना वाटतं देशात हिंदूराज असावं आणि फक्त हिंदू संस्कृतीलाच या देशात स्थान आहे. गांधीजी या वेड्या कल्पनेविरुद्ध लढताहेत. ते म्हणतात, केवळ ऐक्यच आपलं संरक्षण करू शकतो.

प्रथमच आपल्या प्रौढांना मताधिकार मिळाला आहे. जोपर्यंत लोक आपल्या अधिकाराचा वापर योग्य बुद्धीने करणार नाहीत, तोपर्यंत प्रजासत्ताक राज्य टिकणार नाही आणि त्यामुळे आपण खूप काही गमावून बसू.