महात्मा गांधी यांच्यासोबत सरदार पटेल

१९१७ पर्यंत पटेल एक यशस्वी बॅरिस्टर म्हणून ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या कारकिर्दीतला हा अत्युच्च काळ होता. उत्तम सूट परिधान करून दिवसा कोर्टात
आपल्या आशिलांसाठी लढायचे आणि संध्याकाळी अहमदाबादच्या गुजरात क्बलमध्ये प्रतिष्ठित
लोकांबरोबर ब्रिज खेळायचे. त्यांना सिगार ओढायचा शौक होता. त्याच काळात अफ्रिेकहून
परतलेल्या गांधी नावाच्या व्यक्तीचा बोलबाला होत होता, पण त्या प्रतिथयश बॅरिस्टरनी
त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पटेलांनी सुरुवातीला गांधीजींच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रहाबद्दल’
ऐकलं, तेव्हा त्यांनी त्यांना वेड्यात काढलं आणि त्यांची टिंगल उडवली.

गांधींजींना गुजरात क्लबमध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांना
पाहण्यासाठी खूप गर्दी झाली. पटेलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ब्रिजच्या टेबलवरच
बसून राहिले. लोकांच्या गर्दीचा त्रास होत असल्यामुळे ते नाराज झाले. जेव्हा एका मित्रानी
गांधीजींचा भाषण ऐकण्यासाठी बोलावलं तेव्हा ते तुच्छपणे म्हणाले, ‘मला माहीत आहे, ते
काय बोलणार आहेत. ते विचारतील की, तुम्हाला गव्हातून खडे कसे निवडायचे हे माहीत आहे
का. त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. पण लवकरच या टिंगल आणि टीकेचं रूपांतर
आदरात झालं.

एप्रिल १९१७ मध्ये गांधीजींनी बिहारच्या चंपारण क्षेत्रात निळीच्या शेतकर्‍यांना आधार दिला. सरकार शेतकर्‍यांना जबरदस्तीने निळीची शेती करायला लावायचा आणि पीक आल्यावर कमी किंमतीत विकत घ्यायचा. याच्या विरोधात शेतकर्‍यांना घेऊन गांधीजींनी सत्याग्रह केला. या अन्यायात भर म्हणून त्या वर्षी दुष्काळ पडला. चंपारणच्या सत्याग्रहाचा पटेलांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.  या घटनेनंतर गांधीना गुजरात सभेच्या अध्यक्ष स्थानी आमंत्रित करण्यात आलं.

गुजरातमधील शेतकरी गटाच्या वतीने खेड्यात गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला. गांधीजींनी या मोहिमेत पटेल यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद दिले. या प्रकारे गांधीजी आणि पटेल यांच्यातील जीवनभरचा संबंध सुरू झाला . पुढे काही वर्षांमध्ये, पटेल हे गांधीजींच्या उत्कट अनुयायी आणि सत्याग्रहींपैकी एक झाले.